हवामान खात्यांच्या अंदाज़ पुन्हा चुकला
- lokpatra2016
- Jun 18, 2020
- 1 min read
मान्सूनची आनंदवार

दर वर्षीप्रमाणे यंदाही हवामान खात्यांच्या तारखांचा आणि पावसाच्या प्रमाणाच्या अंदाजांना चकवा देत, मान्सूनने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. अर्थात, त्याची मुंबईची तारीख टळली असली, तरी येत्या एक-दोन दिवसांत मान्सून मुंबईतही मूळ धरेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रात त्याचे जोरकस आगमन झाले आहे. गेल्या २४ तासांत मराठवाड्याला शिरत असताना, त्याने एकट्या परभणीत विक्रमी १९० एमएम पावसाची नोंद केली. म्हणजे संपूर्ण जूनचा कोटा त्याने एका दिवसात पूर्ण केला. सुरुवातीपासून मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचा अंदाज होताच; मात्र त्याचे वेळापत्रक आणि प्रमाणाचा अंदाज चुकल्याने चकित व्हायला झाले. मान्सून अद्यापही आपले सर्व रहस्य उघड करत नाही, असे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आता लवकरच त्याचा वेग वाढेल आणि सरासरी पाऊस चांगला होईल, हा अंदाज आहे. तेवढा तो पडायला हवा. दोन-तीन दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अजून वाढेल. यंदा एकंदरीतच नेहमीपेक्षाही जास्तीचा पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले आहे. येत्या ४८ तासांत अनुकूलता खूप अधिक असल्याने पावसाचा जसा मारा सिंधुदुर्गात झाला, तसा तो मुंबईतही होईल. शिवाय, अन्य भागांसह तो महाराष्ट्र व्यापेल. त्याचे कर्नाटक आणि गोव्यातील आगमन काही दिवसांपूर्वी झालेले आहे. त्यानुसार तो अधिक वेगात गुरुवारी मुंबईपर्यंत यायला पाहिजे होता; परंतु तसे झाले नाही. तथापि, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राव्यतिरिक्त छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि ईशान्य भारतातही मान्सून आपली हजेरी लावेल, असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याकडे दीडशे वर्षांहून अधिक वर्षांचा मान्सूनचा डेटा आहे. त्यानुसार, तसेच उपग्रह माहितीतूनही दर वर्षी अंदाज व्यक्त केले जातात. या दीर्घकालीन अंदाजानुसार यंदाचा पाऊस हा उत्तम आणि भरपूर असेल. भारताच्या अर्थकारणाच्या दृष्टीने मान्सून हा महत्त्वाचा आहेच, त्याचबरोबर तो जवळपास निम्म्या जगाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. जून ते सप्टेंबर हा त्याचा कालखंड भरपूर पावसाचा आहे, या अंदाजामुळेच ही दिलासादायक घटना आहे.
Kommentare