नीट आणि जेईई मेन परीक्षा निश्चित तारखांवर होणारविद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लावू नका : सुप्रीम कोर
- lokpatra2016
- Aug 17, 2020
- 2 min read

नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाने आज नीट आणि जेईई मेन २०२० प्रवेश परीक्षा संबंधी महत्वाचा निर्णय देत या परीक्षा निश्चित तारखांवरच घेण्यासंबंधी निर्देश दिले आहेत.या परीक्षा टाळण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावत गुणवत्तेशी तडजोड करता येणार नाही,कोरोना आहे म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लावू नका असे म्हटले आहे.त्यामुळे आता जेईई मेन २०२० परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर तर नीट २०२० परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होतील.
न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्या. बीआर गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने याप्रकरणी निर्णय देत म्हटले की, 'आयुष्याला आपण असे थांबवू शकत नाहीत. आपल्याला सुरक्षा उपायांनी पुढे जाणे आवश्यक आहे, कोरोना आहे म्हणून आपण विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावू शकत नाही.' दरम्यान परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया घालवायचे आहे का? असा सवालही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला.
परीक्षांविरोधात युक्तिवाद करताना याचिकाकर्त्यांचे वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी खंडपीठासमोर युक्तिवाद करताना कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा हवाला दिला. ते म्हणाल की, राज्य बोर्डाच्या तसेच सीबीएसई आयसीएसई आणि एआयबीईच्या परीक्षा रद्द करता येतात तर जेईई आणि नीट का नाही. ते म्हणाले की आम्ही या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा मागणी करीत नाही, परंतु सद्य परिस्थितीत टाळणे हा एकच पर्याय आहे.
या वेळी परीक्षेच्या बाजूने युक्तिवाद करताना नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या याचिकेला विरोध करत म्हटले की, परीक्षा जर ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतल्या तर सर्व सुरक्षा उपाय आमच्या वतीने घेण्यात येतील यासाठी संपूर्ण तयारी केली गेली आहे.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्याला पणाला नाही लावू शकत. कोर्टाने याचिकाकर्त्यांना विद्यार्थ्यांच्या एका वर्षाला किंमत देण्याचा सल्ला दिला.
महाराष्ट्रासह ११ राज्यांतील विद्यार्थ्यांनी जेईई मेन आणि नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. देशातील कोरोनाच्या काळात परीक्षांचे आयोजन न करण्याची याचिकेत मागणी केली होती. परीक्षांच्या ठरलेल्या तारखा पुढे ढकलल्या पाहिजेत, असेही याचिकेत म्हटले होते. यावेळी दोन्ही परीक्षांसाठी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा विरोधी याचिकेत याच मुद्द्यावर भर देत इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका वाढू शकतो असे म्हटले होते.
दरम्यान कोर्टाच्या या निकालानंतर आज जेईई मेन परीक्षा २०२० साठी प्रवेश पत्र जारी करू शकते.
Commentaires