वाळूज -पंढरपुरात पुन्हा जनता कर्फ्यू
- lokpatra2016
- Jun 17, 2020
- 4 min read

वाळूज -पंढरपुरात पुन्हा जनता कर्फ्यू
संसर्ग वाढल्याने ग्रामपंचायतीचा निर्णय
वाळूज/प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा एकजुटीने सामना करण्यासाठी पंढरपूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने बुधवारपासून (१७ जून) तीन दिवसांसाठी कडक संचारबंदी (जनता कर्फ्यू) घोषित केला असून यादरम्यान घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच अख्तर शेख यांनी सांगितले. मागील आठ दिवसांमध्ये गावात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याने रुग्णाची संख्या वाढत आहे.यावर उपाय म्हणून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्याचा निर्णय सोमवारी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या मासिक बैठकीत घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अख्तर शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच महेंद्र खोतकर, ग्रामसेवक नारायण रावते यांची उपस्थिती होती. तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब राऊत, अप्पासाहेब साळे, मेहबूब चौधरी, राजेंद्र खोतकर, अनिल कोतकर, तस्लीम शेख, अंजीराबेगम शेख, फिरोजा शहा, पूजा उबाळे, सुमन खोतकर, मीरा गिऱ्हे, संगीता गायकवाड आदींची उपस्थिती होती. असे असतील नियम : बुधवार, १७ जूनपासून तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. या वेळी रुग्णालय व औषधी दुकाने वगळता इतर सर्वच आस्थापने बंद असणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांकडून ५ हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून आल्यावर २०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. आरोग्य विभाग व आशा कार्यकर्त्या यांच्यातर्फे प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून नागरिकांना औषधीचे वाटप केले जाणार आहे. गावात नव्याने चार आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात यावी यासाठी जि.प. प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, खासगी डॉक्टरांची सेवा घेणे आदी निर्णय सभेत घेण्यात आले.

माणुसकी मेली : कोरोना नसतानाही मृतदेहाची अंत्यसंस्कारासाठी फरफट
औरंगाबाद /प्रतिनिधी
कोरोनाच्या दहशतीने माणुसकी मात्र ठार झाली आहे.जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधित नसलेल्या तरुणाचा औरंगाबादेत मृत्यू झाला. मात्र, गावकऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कारास विरोध करत मृतदेह गावात आणूच नका, असे बजावले. घाटीनेही देहदान करून घेण्यास नकार दिला. ‘काय विल्हेवाट लावायची ती तुम्हीच लावा,’ असे सांगितले. १० तासांच्या फरपटीनंतर औरंगाबादमधील पुष्पनगरीत दोन भावांनी त्याला अग्निदाह दिला.या हृदयद्रावक प्रकाराबाबत त्या ३५ वर्षीय तरुणाच्या नातेवाइकांनी सांगितले की, तो वाळूज येथील एका कंपनीत काम करत होता. शुक्रवारी सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने तो घाटी रुग्णालयात दाखल झाला. तत्पूर्वी त्याने जालन्यातील भावाला माहिती दिली होती. त्यामुळे तो औरंगाबादेत आला. तपासणीत त्याला कोरोना नाही, न्यूमोनिया झाला असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तरुणाचा चुलतभाऊही आला. दोघांनी मिळून त्याला खासगी रुग्णालयात हलवण्याचे ठरवले. त्यासाठी मोठा भाऊ जालना येथे पैशांची जुळवाजुळव करत होता. तोच सोमवारी सकाळी ११ वाजता भावाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटीतून देण्यात आली. तो तातडीने औरंगाबादला आला. दरम्यान, या संदर्भात घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.अखेरचा पर्याय म्हणून सायंकाळी त्या तरुणाच्या दोन्ही भावांनी क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले. सहायक फौजदार शांतीलाल राठोड, सहायक पोलिस निरीक्षक नजीर तडवी यांना सर्व हकीगत सांगितली. राठोड यांनी अंत्यसंस्काराच्या परवानगीसाठी पोलिसांचे प्रमाणपत्र मनपाला दिले. त्यानंतर पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळताच गावकऱ्यांपैकी कोणीही मदतीस तयार होईना. मृतदेह इकडे आणून गावात अंत्यसंस्कार करू नका, असेही सांगण्यात आले. कोरोना नव्हे न्यूमोनियाने मृत्यू झाला, असे वारंवार सांगूनही गावकरी ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या भावाने घाटी प्रशासनाला देहदान करून घेण्याची विनंती केली. मात्र, ती मान्य करण्यात आली नाही. उलट तुमच्यास्तरावर तुम्ही अंत्यसंस्कार करा अथवा पोलिस कारवाईला सामोरे जा, असे उत्तर मिळाले.या घटनेमुळे कोरोनाच्या संकटात माणुसकीचेही मरण ओढावल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले.

शाळा सुरू करण्यास पालकांचा तीव्र विरोध
औरंगाबाद /प्रतिनिधी
मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे. शिक्षणामुळेच त्यांचा विकास होणार आहे. मात्र, त्याबरोबरच मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी वाटते. शहरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची गरज असल्याचा सूर शहरातील पालकांसह संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी काढला. राज्य शासनाने शाळा सुरू करता येतील का, याविषयी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शाळांमध्ये नियम पाळले जातील का, असा प्रश्न यावेळी सर्वांनी उपस्थित केला. फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी शाळांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आहेत का, विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस, रिक्षांमध्ये विद्यार्थी दाटीवाटीने बसविले जातात. शाळा सुरू झाल्यास या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे काय होणार, असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत. या सर्व अडचणींमुळे अनेदक पालकांनी पाल्यांना शाळेत न पाठविण्याचीच भूमिका घेतली आहे. घरी बसून त्यांचा अभ्यास घेता येईल. मात्र, त्यास शाळेत पाठवून जीव धोक्यात घालण्यास आम्ही तयार नाहीत, असेही काही पालकांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता शाळा सुरू करणे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याची घाई शासनाने करू नये अशी ठाम भूमिका पालक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्त करीत आहेत. शिक्षण विकास मंच या शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांच्या फेसबुक समूहावर सदस्य व शिक्षक असलेल्या जयवंत कुलकर्णी यांनी शाळा सुरु करण्याबाबत घेतलेल्या मतदान सर्वेक्षणात राज्यातील सदस्यांपैकी ३५० हून अधिक सदस्यांनी शाळा सुरु करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर ७७ सदस्यांनी शाळा सुरु करणे योग्य असल्याचे म्हटले आहे. काहीजण शिक्षण विभागाच्या या निर्णयाबद्दल साशंक असून काहींनी वयोगटानुसार व ईयत्तानुसार शाळा सुरु करण्याचा विचार व्हायला हवा असे मत नोंदवले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीचा विचार करून ७० टक्क्यांहून अधिक पालक शिक्षकांना शिक्षण विभागाने शाळा सुरु करणे हितावह नसल्याची माहिती आपल्या सर्वेक्षणातून त्यांनी दिली.
शाळा सुरु होणार का? कुठे सुरु होणार ? ऑनलाईन अभ्यास आणि तासिका कशा असतील या सगळ्याच गोष्टींबद्दल अद्याप गोंधळ आहे. जरी मे महिना संपत आला असला तरी जूनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही लाखांत असेल असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यात कोरोना ग्रामीण भागात पोहोचला असून अनेक कामगार पालकांनी स्थलांतर केले आहे. अनेक शाळा, महाविद्यालये शासनाने क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतले आहेत. त्या कधी रिकाम्या होणार हे देखील माहिती नाही तर त्यांचे निर्जंतुकीकरण कधी करणार असे प्रश्न पालक आणि शिक्षक उपस्थित करत आहेत. शिवाय शिक्षकांना मे महिन्याच्या सुट्टीत ही कोरोनाचे काम करावे लागले आहे. आताही ऑनलाईन शाळा सुरु करून शिक्षकावर कामाचे ओझे लादले जात असल्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी दिली.एकीकडे आर्थिक अडचणीत सापडलेला असताना इ लर्निंगसाठी आवश्यक स्मार्टफोन , लॅपटॉप यांचा खर्च पालकांना बुचकळ्यात टाकणारा असल्याचे मत पंड्या यांनी नोंदविले आहे. अद्याप अभ्यासक्रम कसा असणार आहे? दिवसाचे किती तास ऑनलाईन अभ्यास घ्यायचा याबद्दल काहीच निर्देश नाहीत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने शाळा सुरु करण्याची घाई नको असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. काही पालकांनी आम्हाला आमची मुले महत्त्वाची आहेत, आम्ही मुलांना घरी बसवून शिकवू पण इतक्यात शाळांमध्ये पाठवणार नसल्याची भूमिका घेतल्याचे ही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
Opmerkingen