रामदेवबाबा पायरी हुकले अन थोबाडावर पडले
- lokpatra2016
- Jun 27, 2020
- 5 min read

रामदेवबाबांच्या पतंजली औषध कंपनीने अक्षरशः जत्रेत जडीबुटीचे दुकान मांडावे त्या प्रमाणे पत्रकार परिषद घेऊन कोरोना वायरसवर औषध काढल्याचा दावा केला आणि सगळीकडे खळबळ माजली. आपल्या कोरोनील या औषधामुळे कोरोना शंभर टक्के बरा होतो.असा दावा त्यांनी केला. मात्र, लॉन्च झाल्यापासूनच हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आयुष मंत्रालयाकडून परवाना नसताना आणि चाचणी न करताच रामदेव बाबांनी औषध लॉन्च सुद्धा करून टाकलं.विशेष म्हणजे हे औषधच बोगस आहे.राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारने या औषधावर बंदी घातलीय.आयुष मंत्रालयाने त्याच्या विक्री वितरण आणि जाहिरातीवर बंदी घातली आहे.मोदींच्या राज्यात आपले काहीही धकून जाईल या फाजील आत्मविश्वासातून रामदेव बाबांनी पायरी सोडली,आणि अर्थात थोबाडावर पडले.
---------------------------------
पण सगळे कोरोना वायरसची साथ संपायची वाट बघतोय. आत्तापर्यंत देशात जवळपास साडे चार लाख लोकांना कोरोनाची लागण झालीय. हा आकडा कमी व्हायचं नावंच घेत नाहीय. येत्या काही महिन्यात भारतातल्या एक कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय. वायरसवर एखादी लस निघावी याची सगळं जग डोळ्यात तेल घालून कोरोना वाट बघतंय.
आता अशात कोरोना वायरसवर औषध आलंय असं आपल्याला कुणी सांगितलं तर? हे औषध पेशंटला अगदी ठणठणीत बरं करू शकतं. म्हणजे कोरोनाची लागण झाली तरी हे औषध घेतल्यावर त्यातून बरं होण्याची अगदी १०० टक्के शक्यता आहे. हे वाचून आपल्याला काय वाटलं? काय बरं झालं असंच ना!असाच दावा करत योगगुरू रामदेव बाबांनी २३ एप्रिलला हरीद्वारमधे एक मोठा लॉन्च इवेंट केला. या इवेंटमधे पतंजलीने कोरोना किट तयार केलं असल्याची घोषणा केलीय. या किटमधे असलेलं रामदेबाबांनी बनवलेलं कोरोनिल हे औषध घेतलं तर कोरोना वायरसची लागण झालेला एकही माणूस मरणार नाही, असं पतंजलीनं छाती ठोकपणे सांगितलंय.
कोरोना वायरसवरचं किट
हरिद्वारमधे घेतलेल्या या इवेंटमधे पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यासोबतच वैद्यकिय क्षेत्रात काम करणारे अनेक लोक उपस्थित होते. इवेंटमधे जयपूरच्या एका खासगी मेडीकल कॉलेजचे चेअरमन बलवीर तोमर आणि त्याच कॉलेजमधले काही प्राध्यपकही उपस्थित होते. जयपूरच्या याच मेडीकल कॉलेजसोबत रामदेव बाबांच्या पतंजली या संस्थेनं कोरोना किट तयार केलंय.
अगदी हातात मावेल इतक्या आकाराच्या एका बॉक्समधे हे किट उपलब्ध करून दिलं जाईल. या किटमधे तीन गोष्टी असतील. एक कोरोनिल हे औषध, दुसरं श्वासारी आणि तिसरं अणु तेल. त्यातलं श्वासारी आणि अणु तेल या दोन गोष्टी पतंजलीकडून आधीपासूनच विकल्या जातायत. सर्दीमुळे नाक चोंबलं असेल तर या अणु तेलाचे दोन थेंब नाकात टाकायचे असतात. तर आपली फुफ्फुसं चांगली रहावीत यासाठी श्वासारी गोळ्या आहेत.यातली नवीन गोष्ट आहे ती म्हणजे कोरोनिल हे औषध. ‘या कोरोनिल औषधात गेलॉय, तुलसी आणि अश्वगंधा आहे. या गोळ्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्याचसोबत मधुमेह, ब्लड प्रेशर, दृदयाचे ठोके आणि आपलं संपूर्ण नाडी तंत्र नियंत्रित करतं,’ असं दस्तुरखुद्द रामदेव बाबांनी हरिद्वारच्या इवेंटमधे सांगितलंय.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध
अशा या कोरोना किटचं उत्पादन हरिद्वारमधल्या दिव्य फार्मसी आणि पतंजली कंपनीकडून केलं जाईल. नागरिकांसाठी ५४५ रूपयांना हे किट उपलब्ध असेल. त्यात एक महिन्याच्या गोळ्या असतील. असं असलं तरी, या गोळ्यांमुळे कोरोना वायरसचा पेशंट ३ ते ७ दिवसांत १०० टक्के बरा होतो, असा दावा रामदेव बाबांनी केलाय. हे क्लिनिकली टेस्टेड औषध आहे. म्हणजे, कोविड १९ झालेल्या २८० पेशंटना हे औषध दिलं गेलं. त्यातले ६९ टक्के लोक तीन दिवसांत बरे झाले तर १०० टक्के लोकांना बरं करायला एक आठवड्याचा कालावधी लागला, असं रामदेव बाबांनी या इवेंटमधे सांगितलं.
खरंतर, साथरोग पसरवणारा नवा कोरोना वायरस निर्माण झालाय हे चीनमधल्या डॉक्टरांनाच जानेवारी महिन्यात समजलं. तरी कोरोनिल हे औषध बनवण्याची तयारी डिसेंबर २०१९ पासूनच सुरू झाली होती असं पतंजली रिसर्च इन्सिट्यूटचे अध्यक्ष डॉ. अनुराग वार्ष्णेय यांनी सांगितलंय.शिवाय, ८ एप्रिलला पतंजलीच्या युट्यूब चॅनेलवर एक वीडियो अपलोड झालाय. या वीडियोत गेलॉय आणि अश्वगंधा या दोन गोष्टी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आहेत, असं रामदेव बाबांनीच सांगितलंय. आता अचानक या दोन गोष्टी मिळून बनवलेलं औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं नाही तर थेट शरीरातला कोरोना वायरस नष्ट करणारं औषध असल्याचं रामदेव बाबा म्हणतायत.नेमके कोणते मापदंड वापरले?सगळ्यात मोठा वाद या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलवरून होतोय. कोरोना वायरसच्या एखाद्या औषधाची चाचणी करायची असेल तर त्यासाठी या वायरसची लागण झालेल्या काही लोकांवर त्या औषधाचा प्रयोग करावा लागतो. असा प्रयोग पार पाडण्यासाठी काही मापदंडाचंही पालन करावं लागतं. जगातल्या अनेक मोठ्या संस्थांनी आपापले मापदंड जाहीर केले आहेत. भारतीय मेडीकल रिसर्च काउन्सिलिंगचेही काही मापदंड आहेत.रामदेव बाबांनी क्लिनिकल ट्रायल कुठे केली, कशी केली, कोणते मापदंड पाळले याची कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. हरिद्वारमधे झालेल्या सभेत बलवीर तोमर यांनी याबाबत काही माहिती दिली. जगातल्या सगळ्या संस्थेने सांगितलेली मापदंड पाळून आम्ही नॅशनल इन्सिट्यूट ऑफ मेडीकल सायन्समधल्या १०० पेशंटवर या औषधाचं टेस्टिंग केलं. रॅन्डमाइज्ड प्लसीबो कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल केली असल्याचं त्यांनी सांगितलं. या ट्रायलमधे कोरोनाच्या ५० पेशंटना औषध म्हणून प्लसीबो देण्यात आले. प्लसीबो म्हणजे खोटी ट्रीटमेंट. औषधांच्या नावावर कॅप्सुलमधे पावडर घालून देणं. तर उरलेल्या ५० पेशंटना कोरोनिल आणि उरलेली दोन औषध दिली गेली. त्यानंतर ३ ते ७ दिवसानंतर त्यातल्या १०० टक्के लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव आली. पण ज्यांना औषध दिलं गेलं नव्हतं त्यातल्या ६५ टक्के लोकांची टेस्ट निगेटिव आली. म्हणजे, या औषधामुळे बरं होण्याचं प्रमाण ३५ टक्क्यांनी जास्त आहे.
गंभीर आजारी असणाऱ्यांचं काय?
आता औषध घेतल्यानंतर बरं झालेल्यांच्या रिपोर्टवर कसा विश्वास ठेवायचा हा मुख्य प्रश्न आहे. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती त्यातून बरी झाली असली तरी त्या व्यक्तीची टेस्ट ३ वेळा निगेटिव येत नाही तोपर्यंत ती व्यक्ती कोरोनामुक्त झाली असं म्हटलं जात नाही. रामदेवबाब मात्र एकाच टेस्टमधे व्यक्ती कोरोनामुक्त होईल, असा दावा करतयात.पतंजलीचा दावा सत्य आहे, हे सगळे पेशंट कोरोनामुक्त झाले असं म्हटलं तरी कोरोनिलची टेस्ट करण्यात आलेल्या किती व्यक्ती गंभीर स्वरूपात आजारी होत्या हा प्रश्न पुढे येतोच. हायड्रोक्लोरोक्वीन किंवा काही दिवसांपूर्वीच आलेलं डेक्झामेथाझोन या औषधासारखीच कोरोनिल या औषधाची गत होईल.कोरोना वायरसचा मृत्यूदर हा अत्यंत कमी आहे. खूप गंभीररित्या आजारी पडणाऱ्या माणसांनाच मरणाचा धोका असतो आणि भारतात तर बहुतांश लोकांना खूप सौम्य लक्षणं दिसतात असं वारंवार म्हटलं जातंय. कोरोनिलच्या ट्रायलमधेही अशाच लोकांचा समावेश होता. असे लोक काहीही औषध दिलं गेलं नाही तरीही ठिक होऊ शकतात. त्यामुळे ते कोरोनिलमुळेच बरे झाले हा दावा करणं अतिशोयक्तीचं ठरेल असंही म्हटलं जातंय.
सर्दी तापावरचं औषध काढायची परवानगी
कोरोना संदर्भात देशात चालू असलेल्या सगळ्या ट्रायल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने आणि परवानगीने चालल्यात. रामदेव बाबांच्या लॉन्च इवेंटनंतर लगेचच आरोग्य मंत्रालयाने यावर शंका घेतली. हे औषध कसं बनवलं गेलंय, ट्रायल कोणत्या प्रकारे झालीय, त्याचे परिणाम काय याबाबत पतंजलीने आयुष मंत्रालयाला काहीही माहिती पुरवली नसल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
औषध लॉन्च करण्यापूर्वी रामदेव बाबांनी परवागनी घ्यायला हवी होती, असं आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनीही स्पष्टपणे सांगितलंय. ‘पतंजलीने औषध काढलं ही चांगली गोष्ट आहे. पण नियमांप्रमाणे त्यांनी पहिले आयुष मंत्रालयाकडे यायला हवं होतं. पतंजलीने या औषधाबद्दल आपला अहवाल आमच्याकडे पाठवलाय. हे औषध विकण्याची परवागनी त्यांना देण्याआधी हा अहवाल तपासला जाईल,’ असं त्यांनी एशियन न्यूज इंटरनॅशनल या न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितलं.तसंच, कोणतंही औषध बाजारात आणण्याआधी सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या संस्थेचीही परवागनी घ्यावी लागते. कोणतंही औषध विकण्याआधी या संस्थेचं सर्टिफिकेट त्याला लागतं. मात्र, रामदेव बाबा किंवा आचार्य बाळकृष्ण या दोघांपैकी कुणीही अशा सर्टिफिकेटचा साधा उल्लेखही केलेला नाही. द प्रिंटच्या एका बातमीनुसार उत्तराखंडच्या आयुर्वेद ड्रग लायसन्स अथॉरिटीने पतंजलीला ताप सर्दीवर औषध बनवायचं लायसन्स दिलं होतं. त्यावरून रामदेव बाबांनी कोरोनाचंच औषध बनवून टाकलं.
विक्री आधीच घातली बंदी
कोरोना वायरसवर आपल्याला इतकं जालीम औषध सापडलं असताना डब्लूएचओ आणि भारत सरकार मात्र या औषधाकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही. इतकंच काय तर हे औषध ल़ॉन्च केल्यानंतर आयुर्वेद, योग, नॅचरोपथी, उनानी, सिद्ध आणि होमिओपथी यांचं नियंत्रण करणाऱ्या आयुष मंत्रालयानेही त्यावर शंका घेतलीय. हे कमी की काय म्हणून आधी राजस्थान सरकारने आणि पाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर चक्क बंदी घातलीय! आयुष मंत्रालय ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत पतंजलीला या औषधाची जाहिरात आणि विक्री करता येणार नाही असा पावित्रा त्यांनी घेतलाय. थोडक्यात, कोरोना वायरसवरचं हे नवं औषध लोकांना दिलासा देण्यापेक्षा जास्त वादाच्या भोवऱ्यातच अडकून पडलंय.
Attachments area
Comments