राम मंदिराखाली ठेवणार टाइम कॅप्सूल
- lokpatra2016
- Jul 29, 2020
- 2 min read

अयोध्या /वृत्तसंस्था
येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी राम मंदिर निर्माण करताना पायाच्या (बेसमेंट) दोनशे फूट खाली ‘टाईम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार आहे.राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्यानी याबाबत माहिती दिली आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार, भगवान श्रीराम यांच्या जन्मस्थळावरुन भविष्यात कोणतेही वाद प्रवाद निर्माण होऊ नयेत तसेच कायदेशीर वाद उदभवू नयेत, यासाठी हे ‘कालपत्र’ ठेवण्यात येणार आहे.या टाईम कॅप्सूलमध्ये अयोध्या, भगवान राम आणि त्यांचे जन्मस्थान.मंदिराचे निर्माण कधी झाले.मंदिर कोणते आहे याबद्दल संपूर्ण माहिती आणि कायदेशीर कागदपत्रे असतील.हे सगळे संदेश हजारो वर्षे टिकून राहण्याच्या दृष्टीने सुरक्षित जतन राहावेत या दृष्टीने हे कॅप्सूल खास पद्धतीने बनवले आहे.जे भूकंप-महापूर अशा आपत्ती आणि जमिनीतील खनिजाच्या परिणामां पासून सुरक्षित राहील.
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ :३० वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. या ठिकाणी २०० पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास दोन तास हा कार्यक्रम चालणार आहे.
------------------------
लाल किल्ल्यातही टाईम कॅप्सूल
याआधी, १५ ऑगस्ट १९७३ रोजी लाल किल्ल्यात जमिनीच्या ३२ फूट खोल टाईम कॅप्सूल ठेवली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही टाईम कॅप्सूल ठेवली होती. महत्त्वाच्या घटनांची नोंद असलेली कागदपत्रं आणि इतर वस्तू जमिनीत पुरुन ठेवल्या आहेत.
----------------
टाईम कॅप्सूल म्हणजे काय?
टाईम कॅप्सूल ही एखादी वस्तू किंवा माहितीचा ऐतिहासिक दस्तावेज मानला जातो. पुढील पिढ्यांपर्यंत एखादी महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी आणि भविष्यात पुरातत्वशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ किंवा इतिहासकारांना मदत करण्यासाठी टाईम कॅप्सूलच वापर केला जातो.
टाईम कॅप्सूल हा शब्दप्रयोग १९३८ मधील असला, तरी ही संकल्पना जगभरात फार आधीपासून ज्ञात आहे. स्पेनमध्ये नोव्हेंबर २०१७ मध्ये चारशे वर्ष जुनी टाईम कॅप्सूल सापडली होती. यामध्ये येशू ख्रिस्ताच्या मूर्तीसह काही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. अंदाजे १७७७ च्या कालखंडातील आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांबाबत यातून माहिती मिळाली होती.
आयआयटी कानपूरच्या ५० वर्षांच्या इतिहासाची नोंदही टाईम कॅप्सूलमध्ये जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ही टाईम कॅप्सूल जमिनीखाली ठेवली होती. याशिवाय चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाच्या इतिहासाचीही माहिती टाईम कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आली आहे.
Comments