top of page
Search

राखावी अंतरे बहुतांची...

  • Writer: lokpatra2016
    lokpatra2016
  • Jul 1, 2020
  • 3 min read

वर्ष होते शालिवाहन शके १३२८.म्हणजे इसवीसन १४०६.विजयनगरचा राजा वीरूपाक्षाराय मोठे सैन्य घेऊन आला आणि मला पंढरपूरातून उचलून घेऊन गेला.दोरखंडाने बांधून.अक्षरशः जमिनीवरून फरफटत .कोणीही त्याला अडवलं,रोखलं नाही.कोण अडवणार.कसं अडवणार ? जनता भयभीत होती.अल्लाउद्दीन खिलजीच्या सैतानी पाशात तडफडत होती.देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य बुडाले होते.आता चालू आहे ना तशीचअस्मानीसुलतानी चालू होती.महाराष्ट्राच्या उरावर दुर्दैवाचा वरवंटा फिरत होता.जनता त्यात भरडत होती.पाटील-पांड्यावर हुलग्या-बरबड्याच्या भाकरी खाण्याची पाळी आली होती.देवच असुरक्षित होते तिथे माणसांची काय गत.माझा किस्सा तर आणखीनच वेगळा झाला .मोगलांनी इकडल्या अनेक मंदिरातल्या पूजा आर्चा विधी बंद केल्याने,अनेक मंदिरे फोडून उद्धवस्त   केल्याने त्यावरच उपजीविका असणाऱ्या ब्राम्हणाची भलतीच पंचाईत झाली होती.त्यात पंढरीत माझे प्रस्थ वाढले.कर्मकांड विरहित,सर्वसमावेशक,भेदाभेद नसलेला,कुठलेही चमत्कार न करणारा,निशस्त्र,अहिंसावादी,चारित्र्यवान आणि करुणामय जगण्याचा संदेश देणारा वारकरी सम्प्रदाय म्हणजे ब्राम्हणाच्या पोटावर पाय होता.त्या सगळ्यांनी मग आवई उठवली की पंढरीत एक भूत उभे राहिले आहे,आणि सध्या जे धर्म संकट उभे राहिले आहे त्याचे कारण हे भूत आहे.यांच्यामुळेच मोगलाई आली.धर्म बुडाला,दुष्काळ पडला वगैरे वगैरे.ब्रम्हवृन्द बोलले ते विरुपाक्ष राजाला खरेच वाटले.मग काय तो आला,त्याने मला उखडले आणि घेऊन गेला.अक्षरशः जमिनीवरून फरफटत.साखळदंडांनी बांधून.पुढची जवळपास सात वर्षे मी आजच्या कर्नाटकातील आणि तेव्हाच्या विजयनगर साम्राज्यातील हळेबिडात एका काळकोठडीत बंदिस्त होतो.कडेकोट चौकी पहाऱ्यात.साखळदंडांनी बांधलेल्या स्थितीत.भूत ना मी.सुटलो तर पुन्हा अस्मानी सुलतानी माजणार.धर्म बुडणार.सात वर्ष.थोडी थिडकी नव्हे सात वर्ष.इकडे वारकरी सम्प्रदायातील संत नामदेव हवालदिल झाले.काय करावे सुचेना.त्यांनी अक्खा देश पादाक्रांत केला.पंजाबात शिखांकडेही गेले.माझा विठ्ठल दूरदेशी काळकोठडीत खितपत पडलाय त्याला परत माझ्या पदरात घाला म्हणून साकडं घालायला.पण शीख म्हणाले कशाला विठ्ठल बिठ्ठल.कशाला वारकरी सम्प्रदाय.तुम्हीच शीख धर्मात या.नामदेव निराश होऊन पुन्हा महाराष्ट्रात आले.औंढ्याच्या मंदिरात विमनस्क होऊन बसले.तिथे त्यांना विसोबा खेचर भेटले.का रे बाबा असा उदास.पृच्छा झाली.नामदेवांनी आपली कैफियत सांगितली.त्यावर विसोबांनी उपाय सांगितला.हे पहा नामदेवा हे ब्राह्मणांचे कारस्थान आहे,त्याला ब्राह्मणच निपटु शकतो.माझ्या माहितीत एक असा ब्राम्हण आहे जो हळबीडला जाऊन विठ्ठल परत आणू शकतो.कोण आहे असा.नामदेवांनी पुसले.पैठणचे भानुदास बुवा.आहे ब्राम्हण पण कर्मकांडी नाही.सनातनी नाही.दत्त संप्रदायी आहे.तो करील मध्यस्थी.नामदेवांची भटकंती पुन्हा सुरु झाली.विसोबा खेचर,दामाजीपंत आणि संत नामदेव पैठणला गेले.भानुदास महाराजांना भेटले.विठ्ठल परत आणण्यासाठी साकडे घातले.भानुदास महाराजांना सगळं घटित अघटित माहित होतंच.विठ्ठल परत आणणे म्हणजे सनातनी ब्राह्मणांची नाराजी ओढवून घेणे.शिवाय विजयनगरच्या राजाला हे कसे पटवून द्यायचे की हे भूत नाही म्हणून.याच्यामुळे दुष्काळ पडतो.परचक्र कोसळते.राज्य बुडते,निर्वंश होते.का तर या भुताला कोणीही हात लावतं.शिवाशिव होते.सोवळं पाळलं जात नाही.पूजा अभिषेक होत नाही.मुळात हा देव नाहीच.याच्या हातात शस्र कुठे आहेत.कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे.निष्क्रिय पराभूतासारखा.हे अरिष्ट आहे.याच्या मुळे धर्म बुडेल.वगैरे वगैरे.हे सगळं भरवलेलं,पढवलेलं  किटाळ राजाच्या डोक्यातून काढायचं कसं ? पुन्हा स्वजातीचा द्रोह.म्हणजे एका अर्थाने धर्मद्रोहच.ब्राम्हण कांगावा करतील.जातीतून बहिष्कृत करतील.तरी भानुदास महाराजांनी हिकमत केली.विजयनगरला पोहचले.मध्यस्थी केली.विठ्ठलाचा ताबा द्या.त्याला हिंदूंचा देव बनवण्याची हमी दिली .मी परत पंढरीत आलो पण पूर्ण बदलून.माझे बुद्ध रूप वैष्णव झाले.गाभारा आला.बडवे आणि उत्पात आले .त्यांनी माझी पूजा सुरु केली.जलाभिषेक,पंचामृताभिषेक,चंदनलेप,दागिने,वस्र प्रसाधने.वगैरे सगळे कर्मकांड पुन्हा सुरु झाले.मी पुन्हा गाभाऱ्यात कोंडला गेलो.किती वर्ष झाली,मी आहे पंढरीत.पण आजही खुला नाही.हे सगळं कथानक कधीतरी सविस्तर सांगण्यासारखं आहे.कारण कोणीच अभ्यासक कीर्तनकार हे सांगत नाही.हा लपवलेला इतिहास आहे.धर्म आणि भक्तीच्या नावाखाली लपवलेलं एक धगधगीत सत्य .मनातले हे शल्य आज सांगितले ते तुमचे साकडे ऐकून.आज तुम्हाला कोरोना नावाच्या आजाराने त्रस्त केले आहे.आजार आहे भयंकरच.त्याला अजून औषधही सापडेना.माणसे मरताहेत.हे क्लेशकारक आहे.आज पंढरी सुनी सुनी आहे.मन बधिर झालेय.आषाढी निमित्त दरवर्षी आपणाला संदेश देत असतो.यावर्षी काय संदेश द्यावा तेच सुचत नाही .ताटात भाकरी आहे,पोटात भूक आहे,पण खायला हातच वळत नाहीत.तेव्हा करावे काय ? एकमेकांच्या मुखी घास भरावा हेच मानव्य.पण हेच तर आपल्याला कळत नाही.सोशल डिस्टन्स म्हणजे तरी काय ? राखावी बहुतांची अंतरे.म्हणजे अंतर राखा.अंतर पाळा,आणि सोबतच एकमेकांचे अंतर जाणा.मी काय काय भोगले ते तुम्हाला सांगितले.टक्के टोणपे आणखीही खूप सोसलेले आहेत मी .काही घाव अंगावर,काहीकाळजावर.कशाकशाची गिणती करणार.दुःखाचे प्रदर्शन करू नये.तरी मन मोकळे केले.का म्हणून विचारा ? आज कोरोनाच्या संकटाला तुम्ही तोंड देत आहात.या कठीण प्रसंगात तुम्हाला माहित असावे की प्रसंगाचे आघात देवालाही चुकलेले नाहीत,हे देवपण असेच नाही लाभलेले.टाकीचे घाव,फरफट आणि बंधने मलाही चकलेली नाहीत.तरी मन आनंदी ठेवावे,उन्हाळी पावसाळी,ऊन सावली येत जात असते.चक्रवत परिवर्तन्ते सुखानीच दुःखानीच.कोरोनाही जाईल.यथावकाश.तोवर माणूसपण न ढळू द्यावे.राखावी बहुतांची अंतरे. जय हरी !

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9623695024

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by mh 20 lokpatra. Proudly created with Wix.com

bottom of page