मेटे आणि काही मराठा संघटनांना हाताशी धरून भाजप खेळतोय रडीचा डाव : अशोक चव्हाण
- lokpatra2016
- Aug 11, 2020
- 2 min read

मुंबई /प्रतिनिधी
न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेले मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी नव्हे तर ते कायमचे उधळून लावण्यासाठी आणि मराठ्यांच्या हाती तोंडी आलेला घास हिरावून त्यांच्या ताटात माती कालवण्यासाठी राज्यात सध्या मोठे राजकीय षडयंत्र सुरू असून विनायक मेटेंना पुढे करून चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या मराठाद्रोही आंदोलनाचे पडद्यामागचे खरे खलनायक सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मेटे आणि मंडळी राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप करत आहेत. या आंदोलनांचे
बोलविते धनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस असून ही आंदोलने भाजप पुरस्कृत आहेत, असा थेट आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आरक्षणाबाबत कोर्टात असलेल्या खटल्याच्या तयारीबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन भक्कम तयारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनाच सर्वोच्च न्यायालयात कायम ठेवण्यात आहे आहे.त्यांच्यासोबत सरकारतर्फे परमजितसिंग पटवालिया बाजू मांडणार आहेत. हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, रफिक दादा, विजयसिंह थोरात अशी दिग्गज मंडळी मराठा आरक्षणाची बाजू लावून धरणार आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळावी, यासाठी या आरक्षणाच्या विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात आजवर अनेक प्रयत्न केले. परंतु, दरवेळी सरकारने भक्कमपणे बाजू मांडली व मराठा आरक्षणाला धक्का लागू दिला नाही.महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाबत ठाम आणि सकारात्मक आहे.मेटेंना जर इतकीच तळमळ होती तर गेली पाचवर्ष त्यांची माया कुठे आटली होती ? स्वतःच्या पत्रावळीवर आणखी काही तूप ओढून घेण्यासाठी ते काही मराठा संघटनांना हाताशी धरून आंदोलनाचा फार्स करीत आहेत.परंतु त्याला सकल मराठा समाजाचा पाठींबा नाही.मराठा समाज त्यांची सोंगे ढोंगे चांगली ओळखून आहे.असेही चव्हाण यावेळी म्हणाले.चारदोन संघटना आणि त्यांचे दहावीस पदाधिकारी म्हणजे संबंध मराठा समाज नव्हे.मराठा समाजाबद्दल आम्हालाही पोटतिडिक आहे हे कोणी विसरू नये .मराठा समाजाला आजवर आम्हीच न्याय दिला आहे,यापुढेही देऊ.आम्ही आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे लोक नाहीत.आम्ही कधीही समाजाची दिशाभूल करणार नाही.जे आहे ते सत्य सांगू.भूलथापा देणार नाही.हे मेटे आणि मंडळींनी लक्षात घ्यावे.'बुंद से गई सो हौद से नही आती' म्हणतात त्याप्रमाणे भाजपचा खरा चेहरा मराठा समाजासमोर उघडा पडलेला आहे.आता कितीही साळसूदपणाचा आव आणला तरी मराठा समाज मेटेंवर विश्वास ठेवणार नाही.मराठा संघटनांनीनी मेटेंवर विसंबून राहून समाजात स्वतःची इभ्रत घालवू नये असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणावर न्यायालयाची कोणतीही स्थगिती नाही. या प्रकरणाची सुनावणी ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष व्हावी, अशी भूमिका राज्य सरकारने यापूर्वीच मांडली आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यात यावे, या मागणीसाठी येत्या २५ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या तयारीबाबत मराठा आंदोलनातील अनेक प्रमुख नेत्यांशी, वकिलांशी तसेच अभ्यासकांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेकदा चर्चा झाली आहे.
शासनाच्या वकिलांशी नियमितपणे सल्लामसलत होते आहे. ही वस्तुस्थिती असताना मराठा आरक्षणाच्या विरोधात छुप्या कारवाया सुरू झाल्या असून, त्यामुळेच राज्य सरकारवर जाणीवपूर्वक बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मराठा आरक्षण लागू होऊ नये, असा हेतू असलेल्या मंडळींचे हे कारस्थान असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
===============
Comments