भ्रमणगाथा गोष्टी भटकंतीच्या इतिहास जपणारे गाव – कराडे(खुर्द)
- lokpatra2016
- Jun 27, 2020
- 4 min read

मुंबई, नवी मुंबई सारख्या प्रगत शहरांनी विकासाच्या भरात आपल्या ऐतिहासिक खुणा बऱ्यापैकी गमावल्या आहेत.
पनवेल हा नवी मुंबई शहराचा भाग असलेला रायगड जिल्ह्यातील भाग. औद्योगीकरणामुळे पनवेल तालुक्याचा बरचसा भाग आज वेगवेगळ्या कंपन्यांनी व्यापला आहे.
शहरीकरण आणि औद्योगीकरण या सर्वांमध्ये रायगड जिल्ह्यातील काही गाव अजूनही आपला ऐतिहासिक आणि ग्रामीण बाज सांभाळून आहेत. आज अश्याच एका गावाबद्धल आपण जाणून घेणार आहोत..
पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर रसायनी औदयोगिक क्षेत्र आपलं जाळ टाकून बसलेले आहे. या क्षेत्रापासून पुढं पाताळगंगा नदी वाहते. आपण पनवेल रसायनी दहिगाव सावळे अस प्रवास करत पाताळगंगा औदयोगिक क्षेत्रात आलो की काही मोठाल्या कंपनीच्या शेड च्या मागे,आपल्या डाव्या बाजूला डोंगराच्या मागे वसलेले #कुराडेबुद्रुक किंवा #वरचेकुराडे गाव लागते. आपण मात्र गाडी उजव्या बाजूला वळवायची आणि #कुराडेखुर्द किंवा #खालच्याकुराड्यात यायचं.
गावात प्रवेष करतानाच डाव्या हाताला एक तलाव आणि तलावाच्या पलीकडे असलेले सव्वाशे वर्ष जुने श्री गारमातेचे मंदिर आपल्या नजरेत भरते. कोकणच्या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे कौलारू वास्तू. हाच आपला ग्रामीण बाज या मंदिराने अजूनही जपला आहे. गावची ग्रामदैवत असलेल्या श्री गारमातेचे हे मंदिर शके १८२३ म्हणजेच इसवी सन १९०१ साली बांधलेले आहे.लाल रंगात रंगवलेले लाकडी खांब, गॅलरी यां मूळ हे मंदिर अंतर्बाह्य उठून दिसत. मंदिरात तांदळा स्वरूपातील श्री गारमाता स्थापन आहे.

मंदिर आणि परिसरात काही क्षण घालवून आपण गावात यायचं की रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला उद्धवस्त कोट (गढी) नजरेस पडतो. कधीकाळी या भागाच्या सत्तेचे केंद्रस्थानी असणारा हा कोट आज मात्र अस्तित्वासाठी धडपडत आहे. कोटाचे प्रवेशद्वार उध्वस्त आहे, तर संरक्षणार्थ उभारलेले चार बुरुज मात्र अर्धवट पडलेल्या अवस्थेत आहेत. कोटाच्या आत वास्तूंचे चौथरे नजरेस पडतात, याच भागात काही घडीव दगड आपल्या कधीकाळी अनुभवलेल्या वैभवाच्या कथा सांगत इतरत्र पसरलेले आहेत. कोटाच्या आत मध्ये पाण्याची काहीच सोय नजरेस पडत नाही मात्र कोटाच्या पूर्वेच्या तटाला लागून 2 बांधीव विहिरी नजरेस पडतात. बुरुजावरून पाणी आत घेण्याची पूर्वी सोय होती अस स्थानिक सांगतात. हे थोडं वेगळं होत.
महाराष्ट्रातील राजकारण पेशव्यांच्या हातात आल्यानंतरच्या काळातील म्हणजेच साधारण १८ व्या शतकातील हा कोट असावा, कुलकर्णी घरण्याकडून हा कोट आताच्या वैद्य परिवाराने विकत घेतल्याचें समजते.

कोट पाहून आपण थोडं पुढे पाताळगंगा नदीकडे आलो म्हणजे नदीच विस्तीर्ण पात्र, आणि ऐलतीरावर श्री महादेवाचे प्रशस्त शिवालय नजरेस पडते. घडीव दगडामध्ये नदीकाठाला खेटून शिवालय उभे आहे. शेजारी जीर्णोद्धारीत मारुती मंदिर, मंदिर उत्सवांसाठी बांधलेले सभामंडप, मंदिराच्या जवळच मंदिराचे जुने पुजारी यांचे स्मारक वृंदावन आणी त्या शेजारी गावातील लोकांसाठी दशक्रिया विधी चौथरा उभारण्यात आलेला आहे. नदीवर घाट बांधलेला आहे ज्याचा वापर आजही गावातील स्त्रिया कपडे धुण्यासाठी करतात. इतरत्र मंदिराच्या सभामंडपात किंवा मंदिराच्या बाहेर स्वतंत्र नंदिमंडपात विराजमान असणारा नंदी इथं मात्र चक्क गाभाऱ्यात शिवलिंगासमोरच बसलेला दिसतो.
शिव मंदिराच्या बांधणीत आपलं लक्ष वेधून घेतो तो मंदिराचा कळस, सध्या यावर पत्रा घातला असला, तरी मुख्य कळस जो घुमटाकार आहे त्याकडे आपले विशेष लक्ष जाते, घडीव दगडात बांधलेले काळसर मंदिर आणि त्यावर हा नव्याने रंगकाम केलेला कळस. मंदिरांच्या भिंतीवर काही अक्षर अस्पष्ट दिसतात… मंदिराची एकूण जडणघडण आपली निर्मिती पेशवे कालीन असल्याचे दाखवून देते.

मंदिर आणि नदी परिसर न्याहाळताना आपलं लक्ष पैलतीरावर जात आणि आपण काही क्षण स्तब्ध होतो. कारण पैलतीरावर नदी काठावर घाट बांधलेला आहे आणि त्याच्या शेजारी नदी पात्राला लागूनच घडीव दगडात बांधलेले आणि घुमटाकार कळस असलेले मंदिर आपल्या नजरेस पडते. एलतीरावरून पैलतीरावरच हे दृश्य बघितलं की आपलं मन शरीर सोडून तिकडे धाव घेते. गावात चौकशी करून मग आपण आपल्या आल्या रस्त्याने दंडफाटा या ठिकाणावरून आपली गाडी गुळसुंदे गावच्या नदी घाटाकडे वळवायची, मुख्य रस्त्यावर दिशादर्शक फलक आहे. इथूनच जाणारा सिमेंटने बांधलेला रस्ता आपल्याला थेट मंदिराच्या दारात घेऊन येतो. लक्ष्मीनारायण मंदिर, मारुती मंदिर, राम मंदिर,गणेश मंदिर, आणि श्री शिव मंदिर असे एकूण 5 मंदिरांचा हा समूह आहे. जिर्णोध्दारीत मंदिर परिसर आणि मूळ जुने शिव मंदिर अस एकूण परिसर आपल्याला बघायला मिळतो. मंदिर परिसरात प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला श्री मारुती रायाचे मंदिर आणि श्री राम मंदिर आहे. तर डाव्या बाजूला असलेल्या मंदिरात श्री भैरवाची खडग आणि ढाल घेतलेली चार हात असलेली मूर्ती दिसते. बहुदा हेच लक्ष्मीनारायण मंदिर असावे. इथून पुढे आलं की प्रशस्त सभागृह आणि प्राचीन शिव मंदीर लागते, मंदिर पूर्वाभिमुख असून नदीपत्राकडून मंदिरात प्रवेश करताना आपल्याला जिर्णोध्दारीत दीपमाळ दिसते. मंदिराच्या पायर्यांशेजारी गज शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात भव्य नंदी आहे. भिंती आणि छतावर कोरिव काम आहे मंदिराच्या अंतराळात देवकोष्टक आहेत पैकी डाव्या बाजूला श्री गणेशा तर उजव्या बाजूला गरुडावर विराजमान श्री विष्णू चे शिल्प आहे. गाभाऱ्यात जाण्याअगोदर जवळच असलेल्या फलक वाचणे जास्त महत्वाचे आहे.मंदिराचे पवित्र जपूनच गाभाऱ्यात प्रवेश करावा गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मंदिराच्या परिसरात एक भग्न नंदी आहे. तर मंदिराच्या उजव्या बाजूला एका लहान मंदिरात शेंदूर फसलेल्या अवस्थेत एक भग्न वीरगळ, आणि एक व्याघ्र शिल्प आहे.
मंदिरात परंपरागत पुजारी असून मंदिर नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके असण्याकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. मंदिरासमोरच पायऱ्यांचा घाट बांधलेला आहे. कराडे गावा प्रमाणेच घाटांचा वापर गावातील स्रीया कपडे धुण्यासाठी करतात.
कुराडे खुर्द आणि गुलसुंदे ही दोन्ही गावे मुंबई पासून अवघ्या ५० किमी वर तर पनवेल पासून १५ किमी वर आहेत. अगदी अर्ध्या दिवसात आपण ही सगळी ठिकाण पाहून येऊ शकतो. इतिहास जपणारी अशी गाव आवर्जून भेट द्यायला हवीत. विशेष म्हणजे आपल्या गावातील या ऐतिहासिक वास्तूंचा गावकऱ्यांना विशेष अभिमान आहे, त्यामुळं अगदि थोडक्या माहिती च्या आधारे विचारपूस करत तुम्ही सर्व ठिकाणे बघू शकता.कारण फक्त पेशवेकालीन गढी पाहायला गेलेल्या मला ही तीन सुरेख आणि प्राचीन मंदिरे बघायला मिळाली ती गावकऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच. कराडा खुर्द गावापर्यंत जाण्यासाठी मुंबई तूं NH4 (NH48) ने प्रवास करताना पनवेल जवळील “कोन” या गावाजवळून उजवे वळण घेऊन “सावळा-आपटा” मार्गाने आंबिवली गाव गाठावे, इथून मुख्य रस्त्यावरील उजवीकडील वळण घेऊन आपण कराडा खुर्द गावात पोहोचू शकतो. पुरेसा वेळ हाताशी असल्यास जवळच पाताळगंगा धरण, पाताळेश्वर शिव मंदिर वैगेरे परिसर सुद्धा बघून होतो.
महेश तानाजी देसाई
9137132689
Comentarios