बाबरीचे पाप अडवाणींच्या डोक्यावरमंदिराचे पुण्य मोदींच्या पदरात
- lokpatra2016

- Aug 5, 2020
- 3 min read

पाच ऑगस्ट २०२०. अयोद्धानगरीमध्ये एकीकडे राममंदिराच्या भूमिपूजनाची तयारी चालू तर दुसरीकडे शहरातील २० मशिदींमध्ये शुक्रवारची नमाज पढली जात होती. त्याच वेळी भाजप आणि पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेले ९२ वर्षीय लालकृष्ण अडवाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिल्लीत आपल्या घरात बसून हा सोहळा पाहात होते.राममंदिर आंदोलनाचे जनक अडवाणी. त्यांनी ३० वर्षांपूर्वी म्हणजे २५ सप्टेंबर १९९० रोजी राममंदिराच्या संघर्षासाठी सोमनाथहून रथयात्रा काढली होती. तेव्हा कुणीही कल्पनाही केली नसेल की, हेच अडवाणी पुढे चालून श्रीकृष्ण आयोगासमोर बाबरी मशिदी विध्वंसामध्ये आपला कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता, असं सांगतील.प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार अडवाणींना जवळपास साडेचार तास विचारलेल्या गेलेल्या हजारेक प्रश्नांचं सार हेच राहिलं की, ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येमध्ये एक कारसेवक म्हणून उपस्थित होते. पण बाबरी मशिद पाडण्यामध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता. त्यांचं नाव बाबरी विध्वंसकांच्या आरोपी-यादीमध्ये का घेतलं गेलं, या प्रश्नांचं उत्तर त्यांनी दिलं – राजकीय कारणांसाठी. त्यांच्या एक दिवस आधी त्यांचे सहकारी डॉ. मुरली मनोहर जोशी यांनीही याच न्यायालयासमोर दिलेल्या जबाबामध्येही असंच सांगितलं. केवळ अडवाणी किंवा जोशीच नाही तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती आणि तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनीही न्यायालयाला हेच सांगितलं की, त्यांची नावं बाबरी विध्वंसकांच्या आरोपी-यादीमध्ये राजकीय बदल्याच्या भावनेतून गोवली गेली.१३५ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर, प्रदीर्घ संघर्षानंतर आणि हजारो लोकांच्या बलिदानानंतर ५ ऑगस्ट रोजी ठीक बारा वाजून पंधरा मिनिटं पंधरा सेकंदांनी जो बहुप्रतिक्षित क्षण अडवाणींसह तमाम भाजपनेते प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कान्फरसिंगच्या माध्यमातून पाहतील, तेव्हा त्यांचं मनही त्यांना त्यांच्या जबाबासारखंच उत्तर देईल? तसं देणार असेल तर त्यांना वादग्रस्त बाबरी विध्वंसामधला आपला सहभाग नोंदवावासा का नाही वाटणार? त्या वेळी रेकॉर्ड केली गेलेली भाषणं, व्हिडिओ, प्रसारमाध्यमांतील बातम्या आणि अन्य दस्तावेज हे सगळं खोटं आहे आणि केवळ राजकीय बदल्याच्या भावनेतून तयार केलं गेलं होतं?भारतीय जनता मात्र याची कल्पना करू शकणार नाही की, अडवाणी, डॉ. जोशी, उमा भारती, कल्याणसिंह किंवा भाजपचा कुठलाही नेता-कार्यकर्ता राममंदिराच्या निर्मितीच्या कामाबाबतच्या आपल्या महत्त्वपूर्ण योगदानाविषयी संकोच करेल. तेव्हा काय कारण असू शकतं की, अडवाणी आणि इतर तमाम नेते त्याचं श्रेय घेण्याला नकार देत आहेत? खरं तर ते पूर्ण हक्कदार आहेत या श्रेयाचे. असं मानायचं का, की बाबरीचा विध्वंस ही पूर्णपणे वेगळी घटना होती आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवाड्याद्वारे राममंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त करून दिला ही पूर्णपणे वेगळी घटना होती? या दोन्ही श्रेयांचे हक्कदार वेगवेगळे आहेत? या दोन्हींमध्ये संबंध आहेही आणि नाहीही.
असं असू शकतं की, बाबरी विध्वंसाशी एक पक्ष म्हणून भाजपचं केंद्रीय नेतृत्व कुठल्याही प्रकारे संबंधित राहू इच्छित नाही. त्याला विश्व हिंदू परिषदेसारख्या इतर संघटनांच्या मार्गदर्शनाखाली केल्या गेलेल्या स्वतंत्र कारवाईच्या रूपात दाखवू इच्छित असावं. त्या माध्यमातून देशाला व जगाला मुस्लिमांना ‘सकारात्मक’ संदेश देऊ इच्छितं? तसं असेल तर देशातील तमाम हिंदू नागरिक अनेक वर्षांपासून एका अलिप्त भावनेतून आपल्या डोळ्यासमोर घटना घडताना पाहत होते, ते हे स्वीकारतील?भाजपच्या इच्छेचा संबंध याच्याशीही जोडला जाऊ शकतो का, की अडवाणींनी जबाब देण्याच्या एक दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अयोध्या खटल्यातील एक प्रसिद्ध वकील आणि भाजपचे खासदार भूपेन्द्र यादव यांनी त्यांची भेट घेतली होती? त्यामुळे ही शक्यता असू शकते की, अडवाणीचा आधीचा विचार त्यांनी सीबीआय न्यायालयाला दिलेल्या जबाबापेक्षा वेगळा असू शकतो? कारण राममंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला अडवाणींचा इतर कुठलाही जबाब राष्ट्रीय वादाचा विषय होऊ शकला असता (आश्चर्य म्हणजे अडवाणींनी सीबीआय न्यायालयाला दिलेल्या जबाबावर कुठल्याही प्रकारचा राष्ट्रीय वाद झाला नाही.) आणि अयोध्यामध्ये साजऱ्या होणाऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्यांच्या चेहऱ्यांवरच्या तेजावर परिणाम करू शकला असता.अयोध्येतल्या राममंदिरासाठी बाबरी विध्वसांबाबत अडवाणींनी जो जबाब दिला, त्याविषयी थोडीफार खंत व्यक्त केली जाऊ शकते. ज्यासाठी ते इतकी वर्षं संघर्ष करत होते आणि वाटही पाहत होते, त्याचं समाधान आणि श्रेय यांपासून उतारवयात पोहचल्यावर अडवाणींनी स्वत:हून लांब राहणं पसंत केलं? मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त करण्याचं श्रेय इतिहासात कुणाच्या नावे नोंदवलं जायला हवं? या ‘प्रश्ना’चं योग्य ‘उत्तर’ अनुत्तरितच राहणार?आणि बाबरीचे पाप अडवाणींच्या डोक्यावर तर
मंदिराचे पुण्य मोदींच्या पदरात पडणार.कालाय तस्मै नमः



Comments