“पोलिसांना त्यांचं काम करु द्या”, सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- lokpatra2016
- Jul 30, 2020
- 1 min read

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. १४ जून रोजी सुशांत सिंहने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. सुशांत सिंहने टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकं काय कारण होतं याचा मुंबई पोलीस तपास करत आहे. याप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान वारंवार याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत याचिका फेटाळली आहे.
अलका प्रिया नावाच्या तरुणीने ही याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी पोलिसांना त्यांचं काम करु द्या असं सांगितलं. “पोलिसांना त्यांचं काम करु द्या. व्यक्ती चांगली होती की वाईट याचा याच्याशी काही संबंध नाही. याचा कार्यक्षेत्राशीही संबंध आहे. जर तुमच्याकडे काही ठोस आहे तर मुंबई उच्च न्यायालयात जा,” असं सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितलं. सध्याच्या घडीला मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
राजपुतच्या आत्महत्येला आता एक महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांची चौकशी केली आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परिणामी या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी विनंती सातत्याने केली जात आहे. मात्र ही विनंती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी फेटाळली. सुशांत प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीसच करतील असं त्यांनी म्हटलं आहे.
“सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीसच करतील. मुंबई पोलीस योग्य प्रकारे चौकशी करत आहेत. त्यामुळे या केसला सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही,” असं म्हणत अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली.
Comments