नेहरू पंतप्रधान असूनही सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला गेले नव्हते
- lokpatra2016
- Aug 5, 2020
- 2 min read

लोकपत्र विशेष /
मुहम्मद गझनीने बाराव्या शतकात उद्धवस्त केलेल्या,बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या गुजरात मधील सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार १९५१ साली झाला.तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते.मंदिराच्या जीर्णोद्धाराला त्यांची अनुमती होती.त्यासाठी त्यांनी विशेष बाब म्हणून शासकीय तिजोरीतून निधीही दिला होता.देशाचे गृहमंत्री असलेल्या सरदार पटेलांनीच या मंदिराच्या निर्माणात पुढाकार घेतला होता.मात्र आज अयोध्येत ज्या प्रकारे राम मंदिर निर्माणच्या मुहूर्ताला भाजपने मोदी लिमिटेड केले आहे तसा मनाचा कद्रूपणा तेव्हा नेहरूंनी दाखवला नव्हता.विशेष म्हणजे नेहरू स्वतः मंदिराच्या लोकार्पण समारंभाला सुद्धा गेले नव्हते.इतकेच नाही तर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनीही या समारंभाला जाऊ नये अशी सूचना त्यांनी केली होती.
सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमास विश्वस्त मंडळाकडून तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना आमंत्रित करण्यात आले.याची माहिती कळाल्यावर पंडीत नेहरु यांनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याविषयी आपण पुनर्विचार करावा, अशी विनंती केली. ‘आपण एका संवैधानिक पदावर आहात. एखाद्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यातून अनेक प्रकारचे अर्थ निघतात.मी या समारंभाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय धर्मनिरपेक्षतेस बाधा पोहोचेल, अशी कृती आपल्याकडून होऊ नये. तसेच राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा विचार करणंही संविधानानुसार जरुरीचं आहे’. असे नेहरूंनी आपल्या पात्रात म्हटले होते.
नेहरुंचा मंदिरांना विरोध नव्हता. त्यांच्या पंतप्रधान काळात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार झाला.अगदी राम मंदिर आणि काशी-मथुरेचीही चर्चा झाली.मोगल आक्रमणात उध्वस्त करण्यात आलेल्या हिंदू मंदिरांचे पुनर्निर्माण होण्यास काहीच हरकत नाही मात्र, धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेने विशिष्ट धर्माच्या बाजूने असता कामा नये, अशी त्यांची ठाम धारणा होती. म्हणूनच या सोमनाथ जीर्णोद्धार कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारण्यास असमर्थता दर्शविताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री के एम मुन्शी यांना लिहिलेल्या पत्रात नेहरुंनी स्पष्टपणे लिहिलं की ‘सदर कार्यक्रम शासनाचा नाही. हे लक्षात घ्या आणि अशा कार्यक्रमांमध्ये शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण देखील सामील होणं गैर आहे, याची जाणीव आपणा सर्वांना हवी.’
विज्ञाननिष्ठेची कास धरत आयआयटी,आयआयएम,भाभा अनुसंधान सारखी 'आधुनिक मंदिरे' उभारणारे नेहरु कुठे आणि डिजिटल इंडियाच्या राणाभीमदेवी घोषणा करीत 'एकट्याने' राम मंदिराची पूजा करण्याचा हट्टाग्रह करणारे मोदी कुठे.
Commentaires