कोरोना वॉरियर्सचे अनुभव माझी कोविड-19 ड्युटी
- lokpatra2016
- Jul 21, 2020
- 3 min read

शाळेच्या शैक्षणिक कामाव्यतिरिक्त जनगणना, निवडणुका, मतदार याद्या अद्ययावत करणे यासारखी कामे आम्ही शिक्षक शासनाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करत असतो. मी ठाणे महानगरपालिकेत शिक्षिका आहे. शैक्षणिक वर्षातील मार्च महिना चालू होता. आम्हा शिक्षकांची वार्षिक परीक्षेची तयारी चालू होती आणि संपूर्ण देशभर 22 मार्च 2020 पासून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. टीव्हीवर रोज कोरोनाने जगभर कसे थैमान घातले आहे, यावर वेगवेगळ्या प्रकारे बातम्या येत होत्या. सर्वांच्या मनात कोरोना आजाराची भीती वाढत चालली होती. कोरोना आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत, कोणती काळजी घ्यावी त्याचे भयानक रूप कसे असेल या प्रश्नांमध्येच सर्वजण लॉकडाऊन झाले. कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली. आरोग्यखाते, पोलिसखाते, सफाई कर्मचारी यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. सर्व कोविड योद्धे हे कोरोना वॉरियर्स बनून जीवाची पर्वा न करता कामाला लागले. यामध्ये देशाचा नागरिक घडवणारा शिक्षक जो राष्ट्रीय काम करण्यास नेहमीच सज्ज असतो. त्या आम्हा शिक्षकांनाही लगेच कोरोना सर्वे करण्याचे नियुक्तीचे आदेश देण्यात आले. दिनांक 6 एप्रिल 2020 रोजी मलाही ऑफिसकडून सर्वेचे काम करण्याची ऑर्डर मिळाली. मी एरियात जाऊन काम कसे करणार याचे खूपच टेन्शन आले. तब्येतीच्या तक्रारीही होत्याच. डायबिटीस हाय होते. लो बीपी होता. अशा स्थितीत कोरोनाची लागण झाली तर काय करायचे, मुलीचे लग्न मे महिन्यात होते, मला काही झाले तर घरचे कसे होणार ? असे अनेक विचार डोक्यात थैमान घालत होते. घरातून सर्वांनीच ही ड्युटी करण्याला विरोध केला. शेवटी मी मनाशी निश्चय केला आपली ही ड्युटी आहे शिक्षक म्हणून आपण राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे आणि मी ड्युटीवर हजर झाले. दिनांक 6 एप्रिल 2020 पासून ही चालू झालेली ड्युटी आजपर्यंत चालूच आहे. कदाचित कोरोना संक्रमण संपेपर्यंत चालूच राहणार आहे. आमचा शिक्षकी पेशा आणि काम करायचे होते आरोग्यखात्यासोबत. एरियात जाऊन सर्वे करणे, ताप, सर्दी, खोकला व इतर लक्षणे असल्यास रिपोर्टींग करणे अशी कामे आम्हाला दिली होती. सुरक्षिततेसाठी आम्हाला मास्क, ग्लोव्ज दिले. हे ग्लोव्ज कसे घालायचे हे माहित नसल्यामुळे पहिल्या दिवसापासून गमतीजमती घडत गेल्या. रबरी हॅन्ड ग्लोज घालताना कसरत होत होती कारण एका साईजमध्ये हॅन्डग्लोव्ज मिळत नसत. कधी सर्व शिक्षकांची आठ दिवस रबरी हॅन्ड ग्लोज चुकीच्या पद्धतीने हातात घालताना व काढून टाकताना दमछाक होत होती. हळूहळू हॅन्डग्लोव्ज घालणे, मास्क लावणे, स्कार्फ बांधणे एकमेकींना शिकवत आम्ही तरबेज झालो. आता आम्ही डॉक्टर व नर्स झाल्यासारखेच वाटू लागले होते आणि सोबतच एरियातल्या लोकांनीही आमचा पेशा बदलून टाकला होता. वेगवेगळ्या एरियात मी काम करत होते. मनातील भीती कोरोनाबाधित पेशंटच्या आकड्यासोबत वाढत होती. त्यामुळे माझी शुगर लो झाली, चक्कर येणे सुरु झाले, काम करता येईना. रिक्षा बंद असल्यामुळे रोज उन्हातून चालत जाणे चालत येणे करावे लागे. सर्व प्रसंगांना तोंड देत काम करणे चालू ठेवले होते. ज्या भागात मी काम करते तो भाग संपूर्ण कामगार वस्तीचा आहे, हातावर पोट घेऊन जगणारे, मरणाची भीती न बाळगता आयुष्य कंठणारे लोक येथे आहेत. येथील दोन चाळींमधले मधले अंतर दोन तीन फुटांचेच आहे. जमेल तसे एकेका घरामध्ये चार जणांच्या कुटुंबापासून ते दहा जणांच्या कुटुंबात हे लोक दहा बाय दहाच्या खोलीत एकत्र राहतात, कसले सोशल डिस्टंसिन्ग पाळणार ?मला 65 वर्षांच्या आजीबाई इथे भेटल्या. मी त्यांची मैत्रीण झाले आहे. त्यांना जवळचे असे कोणीच नाही. रोज थोड्या गप्पा मारून सोबत आणलेला त्यांना खाऊ देऊन मी व माझी मैत्रीण काम करण्यास पुढे जातो. त्यांना मी धान्यही घेऊन दिले आहे. मध्यम वर्गातील या लोकांकडून परिस्थितीशी दोन हात करून कसे जगावे हे शिकण्यासारखे आहे. सहकार्याची वृत्ती यांच्यात ठासून भरलेली आहे. आम्ही काम करताना याचा प्रत्यय प्रत्येक एरियामध्ये आला. आम्ही आल्याबरोबर घरातील सर्व सदस्य चेकिंग साठी हात सॅनिटाईज करून उभे असतात. कोणीतरी पटकन दोन खुर्च्या बसायला आणून देते. लगेच एकेक कुटुंब बोलावून चेक करून त्यांना पाठवलं जातं. पुढच्या चाळीत ही तशीच सोय करून ठेवली जाते. आम्हाला गरम पाणी पाहिजे का, चहा आणून देऊ का, जेवणाची वेळ झाली आहे तर एखादा लाडू खायला देऊ का अशी विचारणा केली जाते, आमची काळजी घेतली जाते, पण आम्ही त्यांना सांगितले की, एरियात काम करत असताना आम्ही काहीही खात-पीत नाही आणि असं म्हटल्यावर लोक नाराजही होतात. मी व माझी मैत्रीण आमच्या दोघींचेही या एरियातील लोकांशी घरातील सदस्यासारखे सारखे नाते बनले आहे. आम्ही चाळीमधून जाताना विशेषतः आजारी माणसे, लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृद्ध माणसे यांची तब्बेतीची चौकशी करतोच पण कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतलेले पेशंट यांचीही चौकशी करतो.
आम्हाला सुरुवातीला एरियात काम करताना जी काम करण्याची भीती वाटायची ती आता कमी होत गेली आहे. या लोकांप्रमाणे आम्ही कोरोना सोबत जगायला शिकलो आहोत. समस्येत संधी शोधावी याप्रमाणे समाजसेवेची संधी मला या वेळी काम करताना मिळेल तेवढी करून घेते. काही आमचा पालक वर्ग, नातेवाईक, विद्यार्थीवर्ग आम्हास याठिकाणी भेटतो, त्यांच्यामुळे एरियात सुरक्षित वाटते. चार-पाच तास सतत उभे राहून काम करावे लागते त्रास खूप होतो. पाय खूप दुखतात एवढा वेळ काहीही न खाल्या प्यायल्यामुळे चक्करही येते, पण लोकांचे सहकार्य चांगले असल्याने व हे देशहिताचे काम आहे हे स्वीकारल्याने त्रासाची सवय आता करून घेतली आहे. घराबाहेर पडू नका सुरक्षित राहा हा संदेश आमच्याकडून रोजच प्रत्येक घरी दिला जातो. काही लोक आमच्या कामाला सलाम करतात. मुसळधार पावसात आम्ही काम करतो याचं कौतुक करतात.
आम्हीही कोरोना संक्रमण रोखणारे देशाचे कोरोना योद्धे कोरोना वॉरियर्स आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.
आशा मदन तेलंगे
शिक्षिका ठाणे महानगरपालिका ठाणे 7506832981
Comentarios