'कोरोनिल'च्या विक्रीला महाराष्ट्रातही बंदी
- lokpatra2016
- Jun 25, 2020
- 1 min read

मुंबई /प्रतिनिधी
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेने लॉन्च केलेल्या 'कोरोनिल' या करोनावरील औषधांवर राजस्थान सरकारने बंदी घातलेली असतानाच आता महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातली आहे. महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाबा रामदेव यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या कोरोनिल या औषधावर बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायल बाबत कोणताही पुरावा नाही. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाचे क्लिनिकल ट्रायल करण्यात आले होते की नाही, याचा शोध घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असे सांगतानाच महाराष्ट्र सरकार राज्यात नकली औषधांच्या विक्रीला कदापीही परवानगी देणार नाही, हा आम्ही बाबा रामदेव यांना इशारा देत आहोत, असे देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री होणार नसल्याने बाबा रामदेव यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.कोरोनावरील रामबाण उपाय म्हणून कोणीही कोणत्याही औषधांचा दावा करून त्या औषधांची विक्री केल्यास विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं राजस्थान सरकारने या आधीच स्पष्ट केले आहे. या आधी आयुष मंत्रालयानेही बाबा रामदेव यांच्या या औषधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.तसेच बाबा रामदेव यांच्या या औषधाच्या जाहिरातीवरही बंदी घालण्यात आली आहे.आयुष मंत्रालयाकडून या औषधाची चौकशीही करण्यात येत आहे. कुणी कोरोनाच्या नावावर औषध बनवून त्याचा प्रचार आणि प्रसार करू शकत नाही, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीकडून देखील पतंजलीला नोटीस पाठवून खुलासा मागवण्यात आला आहे.
Comments