top of page
Search

कोरोनात बुवाबाजी वाढू नये

  • Writer: lokpatra2016
    lokpatra2016
  • Jun 22, 2020
  • 2 min read

phoptom from news pappetr lokpatra

कोरोनामुळे अनेक ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना तर घडल्याच शिवाय घरगुती हिंसाचारात वाढ, नाते संबंधातील ताण तणावात वाढ आदी घटनाही समोर आल्या. कोरोनामुळे निद्रानाश, मानसिक आजाराचे रुग्णही वाढले आहेत. परवा एकाच दिवसांत जळगाव जिल्ह्यात सहाजणांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोनाच्या संकटातून कशाप्रकारे बाहेर पडावे यासाठी प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे पर्याय शोधत आहे. पण असे पर्याय शोधताना अंधश्रद्धा, बुवाबाजी, मंत्र तंत्राचा आधार घेण्याचे प्रकारही वाढीला लागल्याचे निदर्शनास येते आहे. कोरोनातून बरे करण्याचा दावा करणा-या एका बुवाने चार कुटूंबातील विविध वयोगटातल्या महिलांचे लैंगिक शोषण केले आणि पुरुष मंडळींकडून हजारो रुपयांची लूट केली. या बुवाकडे लॉकडाऊन असतानाही रुग्ण येत होते. मात्र ही फसवणूक आहे आणि आपण फसले गेलो आहोत, हे या रुग्णांच्या तेव्हा लक्षात आले, जेव्हा या बुवाचा मृत्यूच कोरोना संसर्गामुळे झाला. त्याच्या मृत्यूनंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास ६० जणांवर कोरोना मृत्यूची टांगती तलवार लटकली. बिहार, छत्तीसगडमध्ये तर कोरोना देवीची पूजा करण्याचा एक नवाच चमत्कार आकाराला आला आहे. बिहारमधील नदी काठावरच्या गावांमधील महिला नदी किनारी जमा होतात, तिथे सात खड्डे खणले जातात. आपल्या पापाची सजा देण्यासाठी कोरोना देवीला त्या खड्ड्यातून शोधले जाते आणि तिला या देशांतून जाण्यासाठी तिची पूजाअर्चा, नवस केले जात आहेत. या प्रदेशांत महिलांनी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेला पाठीशी घातले आहे. काहीच दिवसांनी या पूजेचे लोणही छटपूजेप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्रातही पोहोचले आणि त्याचा उदो उदो करीत एखादा नवा बुवा उदयाला आला तर नवल वाटायला नको.  अमरावतीमधील चिखलदरा तालुक्यातील कुही येथे दोनच दिवसांपूर्वी काळजाचा थरकाप उडविणारी घटना घडली आहे. आजारावर उपचार करण्यासाठी आजही दुर्गम भागात असे आघोरी प्रकार अवलंबिले जात असल्याचे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले. एका नवजात बालकाचे पोट फुगत होते. एका बुवाने उपचार म्हणून लोखंडी विळा गरम करून बाळाच्या पोटावर चटके दिले. तसेच कवेलुचे खापर घासून ते तेलात मिसळून बाळाच्या बेंबीवर लावण्यात आले. या जीवघेण्या प्रकारामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला. असे प्रकार वाढू नयेत यासाठीही प्रयत्न केले पाहिजे.

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9623695024

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by mh 20 lokpatra. Proudly created with Wix.com

bottom of page