एक ऑगस्टपासून राज्यात दूध बंदी
- lokpatra2016
- Jul 26, 2020
- 2 min read

अहमदनगर /प्रतिनिधी
दूध दरासंबंधी तोडगा काढण्यासाठी सरकारसोबत झालेल्या पहिल्या बैठकीनंतर सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे १ ऑगस्टपासून राज्यात ‘दूध बंद’ आंदोलन करण्यावर शेतकरी संघटना ठाम आहेत. विविध संघटनांच्या ऑनलाइन संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूकाणू समितीचे सदस्य अनिल देठे पाटील यांनी दिली.दुधाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी दूध उत्पादकांनी १ ऑगस्टपासून दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यासोबतच मागील आठवड्यात दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आले. याची दखल घेऊन दुग्धविकास मंत्र्यांनी मंत्रालयात शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेतली. यासंबंधी सरकार योजना आणत असून लवकरच ती जाहीर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, बैठक होऊन पाच दिवसांनंतरही पुढे काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे आंदोलनात सहभागी असलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक झाली. सरकारकडून काहीच हालचाल न झाल्याने १ ऑगस्टपासून दूध बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला.या बैठकीत आंदोलनाचे स्वरूपही ठरविण्यात आले. १ ऑगस्टपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आपल्याकडील दूध कोणत्याही दूध संस्थेला, दूध संघांना देणार नाहीत. त्या दुधातून आपापल्या गावातील चावडीवर सामुहिकरित्या दुग्धाभिषेक आंदोलन केले जाईल. हे आंदोलन स्वयंशिस्त व सुरक्षित अंतराचे नियम पाळून केले जाईल. उरलेले दूध समाजातील गरजू लोकांना मोफत वाटण्यात येईल. त्यानंतर दोन ऑगस्टला पुन्हा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.दुधाला प्रतिलीटर ३० रुपये भाव किंवा प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे, दुधभुकटीला निर्यातीवर ५० रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. दुग्धविकास मंत्री सुनील केदार व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी २१ जुलै रोजी राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांशी ऑनलाईन बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले होते. लवकरच मुख्यमंत्र्यांशी विस्तृत चर्चा करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशी योजना आम्ही आणू असे आश्र्वासन दिले होते. मात्र, पुढे हालचाल न झाल्याने संघटनांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, शेतकरी नेते तथा राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल देठे पाटील, रोहिदास धुमाळ, धनंजय धोर्डे, महेश नवले, सुरेश नवले, डॉ. संदीप कडलग, उमेश देशमुख सहभागी झाले होते. एक ऑगस्टपासून आंदोलन करण्यावर ठाम राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे देठे पाटील यांनी सांगितले.
Comments