top of page
Search

jata pandarishi

  • Writer: lokpatra2016
    lokpatra2016
  • Jun 16, 2020
  • 1 min read

ठामपणे उभे रहा !


तुम्हाला कोणाचा आधार नसुद्यात,तुम्हाला कोणाची साथ नसुद्यात,तुमच्या कोणी सोबत नसुद्यात,तुम्ही अगदी एकटे एकाकी असूद्यात,तुमच्या हाती कुठले आयुध साधन नसुद्यात,तुम्हाला उभे राहण्यासाठी पैस नसुद्यात.फक्त तुम्ही ठाम, स्थिर, अविचल,निर्भय आणि विचारी असले पाहिजे.तुमच्या असण्याचे कारण सकारण असले पाहिजे.तुमच्या अस्तित्वासाठी एवढे सामर्थ्य पुरेसे आहे.मग तुम्हाला कोणीही हटवू शकत नाही.दडवू ,दडपू, लपवू ,झाकवू किंवा नाकारू शकत नाही.किंबहुना हाच तुमचा विजय असतो.त्यासाठी संयमाची सहनशीलतेची प्रयत्नांची कसोटी लागते.पण ती पार केली की लोक तुम्हाला स्वीकारतात.पंढरीतल्या विठोबाच्या मूर्तीत मला जाणवलेलं हे जीवनसत्व आहे.उत्तम जगण्यासाठी ऊर्जाकारक,प्रेरक आणि हानिकारक दोष विकृतींना मारक ठरणारे गुणकारी जीवनसत्व.लक्षात घ्या वेद पुराणात,रामायण महाभारतात नसलेला विठ्ठल जो पंढरीत आहे तो देव नाहीच मुळी.तो एक विचार आहे.जगण्याचा आणि जाणिवांचा विचार.विठ्ठल कधीच विशिष्टांचा नव्हता.माणसा माणसातली विशिष्टता हटवण्यासाठीच विठ्ठलाचे अधिष्ठान पंढरीत उभे राहिलेले आहे.विठ्ठल सर्वार्थी सर्वाठायी सर्वासाठी आहे.असा तो कदाचित पृथ्वीवरचा एकमेव ईश्वर आहे. शैव,वैष्णव,शाक्त,बौद्ध असा सर्वांचा म्हणता येऊ शकेल असा.वारकरी विचार आणि आचार मुस्लिम आणि ख्रिस्त धर्मियांनाही भावणारे आहेत.वारकरी आचारसंहिता जागतिक धर्माची आधारशीला बनू शकते.'येथे वर्ण जाती कुळ अप्रमाण |  भेदाभेद भ्रम अमंगळ ||' असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे.हे असे म्हणणे त्याकाळी सोपे नव्हते.करणे- अंगीकारणे तर त्याहून अवघड.पण तरी वारकरी परंपरेतील संत आणि त्यांची जात धर्म कुळे पहा.वारकरी विचाराचे प्रचारक असणारे नामदेव जातीने शिंपी,तर ज्याच्यासाठी पंढरीत विठ्ठल रूपात एकत्व प्रगटले तो पुंडलिक परीट समाजाचा.सजन चक्क कसाई,संत सेना न्हावी,संत नरहरी सोनार,संत गोरा कुंभार,संत रोहिदास,संत विसोबा खेचर चांभार,संत सावता माळी,संत चोखा,बंका मेळा महार,संत तुकाराम कुणबी,संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वर बहिष्कृत ब्राम्हण, संत जनाबाई,संत सखू दासी,संत कान्होपात्रा गणिका कोल्हांटिणी,मध्ययुगातील सरंजामी सनातनी संघर्षात हा समतेचा मानवतेचा एकतेचा विचार फुलला वाढला आणि टिकला.किती राजे संपले,राज्ये बुडाले,मोगलाई आली गेली,ब्रिटिशांची गुलामगिरी आली गेली.काय काय उलथापालथी झाल्या.पण विठ्ठल आणि त्याचा विचार ठाम उभा आहे.एका साध्या विटेवर.फक्त कमरेवर हात ठेवून.कोणाच्याही आधाराशिवाय.निर्भयतेने.बघा तुम्हाला असे काही जमतेय का ?  


 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9623695024

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by mh 20 lokpatra. Proudly created with Wix.com

bottom of page